बैलांना आंघोळ घालण्यासाठी नदीवर गेला अन् खोल पाण्यात बुडाला
भिवापूर :- पोळ्याच्या दिवशी बैलांना आंघोळ घालण्यासाठी नदीवर गेलेल्या ४० वर्षीय मजुराचा पोहण्याच्या नादात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सकाळी भिवापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिखली येथे घडली. मंगेश काळे (४०), रा. चिखली, असे मृताचे नाव आहे.
मंगेश हा गावातील गारघाटे यांच्याकडे मजुरीचे काम करीत होता. पोळ्यानिमित्त सकाळी सुमारे नऊ वाजता तो गारघाटे यांच्या बैलांना आंघोळ घालण्यासाठी गावाबाहेरील नदीवर गेला होता. नदीतील पाणी पाहून त्याला पोहण्याचा मोह झाला. मात्र, पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो अचानक खोल पाण्यात बुडाला.
शेजारच्या शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी मंगेशला पाण्याबाहेर काढले. त्याला तातडीने भिवापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.
बैलपोळ्याच्या दिवशीच घडलेल्या या दुर्दैवी घटनेने चिखली गावावर शोककळा पसरली. भिवापूर पोलिसांनी घटनेची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.

