विद्यार्थ्यांनी साकारला आगळावेगळा शिक्षक दिन

कोदामेंढी : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तोंडली येथे शिक्षक दिन उत्साहपूर्ण व आनंददायी वातावरणात साजरा करण्यात आला. भारताचे माजी राष्ट्रपती व महान शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

शिक्षक दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका साकारत अध्यापनाचा अनुभव घेतला. विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या भूमिकेत येऊन वर्गातील शैक्षणिक उपक्रम, प्रश्नोत्तर, मार्गदर्शन तसेच विविध जबाबदाऱ्या उत्साहाने पार पाडल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षकाची भूमिका, जबाबदारी आणि अध्यापनातील आव्हाने यांचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला.

या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व, संवाद, लेखन, अभिनय, सर्जनशीलता, नेतृत्व आणि सादरीकरण कौशल्यांना वाव मिळाला. तसेच विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, शिस्त, जबाबदारीची जाणीव, सहकार्याची भावना आणि शिक्षकांविषयी आदर व कृतज्ञता निर्माण झाली.

“अनुभवातून शिक्षण आणि शिक्षणातून व्यक्तिमत्त्व विकास” या संकल्पनेतून विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका अत्यंत उत्साहाने व आत्मविश्वासाने पार पाडल्याने शाळेत आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

या उपक्रमाचे आयोजन मुख्याध्यापिका कु. अनुराधा धुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली सहशिक्षक निलेश जाधव यांनी उत्कृष्टरीत्या केले. शिक्षकांच्या सहकार्याने आणि विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे शिक्षक दिनाचा कार्यक्रम शैक्षणिकदृष्ट्या समृद्ध व संस्मरणीय ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *