दहीहंडीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास

कोदामेंढी: जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तोंडली येथे श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त उत्साहपूर्ण वातावरणात दहीहंडी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शाळेतील विद्यार्थ्यांनी श्रीकृष्ण, राधा तसेच गोप-गोपींच्या आकर्षक वेशभूषा साकारून कार्यक्रमात उत्साहाने सहभाग घेतला.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी शालेय उपक्रमांचा एक भाग म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दहीहंडीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सांघिक भावना, सहकार्य, नेतृत्वगुण, शिस्त, आत्मविश्वास, सामाजिक जाणीव, सर्जनशीलता व सांस्कृतिक मूल्यांची जपणूक यांचा विकास व्हावा, हा या उपक्रमामागील शैक्षणिक उद्देश होता.

वेशभूषा व सांस्कृतिक सादरीकरणातून विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृती व परंपरांची ओळख झाली. तसेच एकत्रितपणे नियोजन करणे, जबाबदारी स्वीकारणे, एकमेकांना सहकार्य करणे आणि समूहभावनेने कार्य करणे याचा अनुभव विद्यार्थ्यांना मिळाला.

कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्साह व आनंदाचे वातावरण होते. “उत्सवातून शिक्षण आणि शिक्षणातून संस्कार” या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळून त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळाली.

या उपक्रमाचे आयोजन मुख्याध्यापिका कु. अनुराधा धुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली सहशिक्षक निलेश जाधव यांनी उत्कृष्टरीत्या पार पाडले. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि शिक्षकांच्या नियोजनामुळे दहीहंडीचा कार्यक्रम आनंददायी व शैक्षणिकदृष्ट्या संस्मरणीय ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *